International Webinar on the occasion of Dr. P..V Kane Birth Anniversary

पांडुरंग वामन काणे यांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय इंटरनॅशनल वेबिनार संपन्न


कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात एकदिवसीय इंटरनॅशनल ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला.

भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे हे थोर संस्कृत विद्वान होते. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले संस्कृत विद्वान ठरले. यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पेढे परशुराम येथे 7 मे 1880 रोजी झाला. त्यांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान बाळगत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राला “भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र” असे नाव देण्यात आले आहे. आज त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत क. का. सं. वि. रत्नागिरी उपकेंद्र भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राद्वारे The Contributions of Dr. P.V kane” या विषयावर एकदिवसीय इंटरनॅशनल वेबिनारचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. लॉरा येरेकेशीवा (Faculty of history at-Farabi Kazak National University ),प्रो. गौतम पटेल (प्रसिध्द संस्कृत विद्वान गुजरात) हे उपस्थित होते. डॉ .कला आचार्य (संस्कृति संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या कार्याअध्यक्षा) या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रो मधुसूदन पेन्ना (क. का. सं .वि. रामटेक कुलगुरू) अध्यक्षा म्हणून उपस्थित होते.डॉ. दिनकर मराठे (रत्नागिरी उपकेंद्र संचालक) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले.

डॉ. लॉरा येरेकेशिवा यांनी हिंदू धर्म आणि मध्य आशियाई इस्लाममधील तीर्थयात्रा यांचा संस्कारांपासुन ते सामाजिक एकतेपर्यंतचा आढावा घेत काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथातील महत्त्वपूर्ण वचनांचा उल्लेख करत तीर्थक्षेत्रे ही समाजाला एका सूत्रात जोडून ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात असे मत मांडले.

प्रो. गौतम पटेल यांनी डॉ. काणे यांचे योगदान या विषयावर बोलत असताना काणे यांच्या जीवनातील अनेक अपरिचित विषयांचा उलगडा करत “काणे हे मला कृष्णा प्रमाणेच वाटतात” असे म्हटले. आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वर्षे धर्मशास्त्राचा इतिहास लिहीण्यासाठी ज्यांनी खर्ची केली असे हे व्यक्तिमत्व येणाऱ्या अनंत पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील असे मत यांनी व्यक्त केले.

डॉ. कला आचार्य यांनी धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथाची ठळक वैशिष्टये नमुद करत संस्कृत साहित्यातील अनेक विद्वानांच्या कृतींचा अत्यंत सूक्ष्म दृष्टीने बारकाईने अभ्यास करत काणे यांनी सर्व स्मृती ग्रंथांचे सार धर्मशास्त्राचा इतिहास यात कसे एकटवले आणि सर्वसमावेशक दृष्टीने या ग्रंथाची रचना कशी करण्यात आली यावर प्रकाश टाकला शेवटी काणेंसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याचा विचार करत उपकेंद्राद्वारे आम्हाला त्यांच्या विषयी बोलण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित करून जणू उपकेंद्राने आम्हाला ऋषी ऋणातुन मुक्त होण्याची संधी दिली असे मत व्यक्त करत त्यांनी उपकेंद्राचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या अंती अध्यक्षीय भाषणात विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. मधुसुदन पेन्ना यांनी कार्य कर्तृत्वाने अजरामर झालेल्या विद्वानांच्या कार्याचे त्यांच्या कृतींचे कालोघात विस्मरण होऊ नये यासाठीच विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राला भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांचे नाव देण्यात आले असून या उपकेंद्राद्वारे या दृष्टीने भविष्यात अनेक कार्ये घडून येतील असे त्यांनी म्हटले. काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथाचा केवळ भारतातच नव्हे तर जगभर अभ्यास होतो याचप्रमाणे काणे यांच्या अन्य भाषांतील साहित्याचे इतर भाषांमध्ये ही अनुवाद करण्याचे कार्य विश्वविद्यालयाद्वारे केले जाईल आणि त्याचा लाभ सर्वांना घेता येईल त्या दृष्टीने विश्वविद्यालय कार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

मान्यवरांच्या व्याख्यानानंतर आभारप्रदर्शन कु. कश्मिरा दळी यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आशिष आठवले यांनी केले. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाला भारतातील तसेच भारताबाहेरील अनेक विद्वान मंडळी उपस्थित होती. विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्यांना ई मेलव्दारे प्रमाणपत्र पाठवण्यात आले. ऑगस्ट महिन्यात उपकेंद्राद्वारे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे यांच्या संस्कृत संबंधातील साहित्यावर आधारित एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन रत्नागिरी येथे केले जाणार आहे.


  -  कु. कश्मिरा दळी










 













Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature