योग - काळाची गरज
योग : काळाची गरज
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व क्षेत्रात उत्तुंग यशाची शिखरे सर करण्यात मानव यशस्वी होत आहे. यंत्र, तंत्राच्या सहाय्याने दिवसागणिक होत चाललेले प्रत्येक क्षेत्रातील विकासाचे चढते आलेख तर आपल्या डोळ्यासमोरच आहेत. या सगळ्या चढा ओढीत शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्याचा समतोल कदाचित ढळलेला दिसतो त्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध असूनही सध्या माणसे सुखाच्या शोधात,मानसिक शांतीच्या शोधात भ्रमंती करताना आपण पाहतो. भौतिक सुविधा उपलब्ध असूनही शारीरिक मानसिक स्वास्थ्याचा समतोल साधून आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहणे, स्वविकासाबरोबरच सामाजिक विकासात योगदान देणे हे प्रत्येकासाठीच आव्हान आहे. स्वपासून सुरु होणारी आणि समग्रापावेतो नेणारी जीवनयात्रा सफल करावयाची असेल आणि जीवनात शाश्वत आनंदाची अनुभूती घ्यावयाची असेल तर मानवी शरीर हे त्यासाठी उत्तम साधन होय आणि या शरीराचे स्वास्थ्य उत्तम राखायचे असेल तर योग साधना ही गुरुकिल्ली होय.
अपि क्रीयार्थं सुलभं समित्कुशं जालान्यपि
स्नानविधिक्षमाणि ते ।
अपि स्वशत्क्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु
धर्मसाधनम् ।
- (कुमारसंभव ५.३३)
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । (Healthy body is an essential instrument for acquiring
dharma) कालिदासाच्या कुमारसंभव
या काव्यातील श्लोकात धर्माच्या प्राप्तीसाठी शरीर हेच महत्त्वाचे साधन आहे असे
म्हटले आहे. प्रसंग असा – कुमारसंभव या काव्यात पार्वती जेव्हा शंकराच्या प्राप्तीसाठी
हिमालयात झाडाचे पानदेखील भक्षण न करता तपश्चर्यारत होती त्यावेळी शंकरांनी तिची
परीक्षा घेण्याकरिता बटू रूपात येऊन काही प्रश्न विचारले. हे पार्वती ! यज्ञ
यागादी क्रियांसाठी तुला येथे समिधा,दर्भ इ. द्रव्ये उपलब्ध होतात ना ? येथील सरोवरातील
जल स्नानादी क्रियांसाठी योग्य आहे ना ?
तू आपल्या शरीर सामर्थ्यास अनुसरून तपश्चर्या करीत आहेस ना ? शंकरांनी पार्वतीला हे
सारे प्रश्न विचारण्याचे कारण एवढेच की धर्माचे आचरण करण्यासाठी शरीर हेच एकमेव
साधन आहे. शरीराची धारणा योग्य प्रकारे झाल्यास पुढे त्याद्वारे धर्म साधणे शक्य
होईल.
शास्त्रोक्त चतुर्विध पुरुषार्थांपैकी धर्माची प्राप्ती
मनुष्याला करावयाची असेल तर शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. दुर्बल शरीराचा मनुष्य
धर्माचरण कसे बरे करणार ? त्यास द्रव्यप्राप्ती कशी होणार व तो सुख तरी कसे उपभोगणार
? यावरून शरीराचे महत्त्व तर प्रत्ययास येतेच त्याच बरोबरीने केवळ शरीर धारणेने
काही प्रयोजन नसून मनुष्याचे शरीर हे उत्तम निरोगी असले पाहिजे. निरोगी शरीर हेच
जीवनातील आनंद प्राप्तीचे द्वार असल्याचे येथे प्रकर्षाने जाणवते. ऐहिक सुख असो वा
पारलौकिक सुख असो दोहोंची प्राप्ती करण्यासाठी शरीर हेच अत्यंत उपकारक साधन आहे. (A sound mind in a sound body) शरीराचे महत्त्व प्रतिपादित करताना म्हणतात –
पुरस्य दार्ढ्ये योगस्य सिद्धिः सर्वार्थसाधनी ।
अखण्डानन्दसिद्धिश्च फलं तेनैव जायते ।।
पुर म्हणजेच शरीर. शरीररूपी नगरी दृढ असल्यास योगाचे सर्व अर्थ (पुरुषार्थ) प्राप्त करून देणारे यश प्राप्त होते. आणि त्यामुळेच चिरकाळ आनंद व आरंभ केलेल्या कार्यात सफलता या गोष्टी प्राप्त होतात.
शरीर स्वास्थ्यासाठी सम्रग मानवजातीच्या कल्याणासाठी योग –
जीवनात सफलता प्राप्त
करावयाची असेल तर शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच
बौद्धिक जागरण ,मानसिक शांती यांची जोड असेल तरच मनुष्य सुखाची अनुभूती घेऊ शकतो.
शारीरिक, बौद्धिक, मानसिक असा सर्वतोपरी समतोल साधावयाचा असेल तर योग साधनेशिवाय
अन्य गुरुकिल्ली नाही. योगसाधनेच्या मदतीने दैनंदिन जीवनातील ध्येयांबरोबरच
आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण करणे शक्य आहे. जगातील प्रत्येक जीवाला सुख आणि शांती हवी असते
आणि प्रत्येक कृतीमागे सुख प्राप्त करणे हेच उद्दिष्ट असते. व्यक्तिगत पातळीपासून
विचार केल्यास अगदी राष्ट्रीय, जागतिक पातळीवरही पाहिल्यास असे नजरेस येते की
सर्वत्र शांती प्रस्थापित करणे हाच प्रत्येकाचा उद्देश आहे. शांती स्थापित
करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाचे चिंतन, प्रयत्न चालू असतात. प्रत्येकाला आपल्या संप्रदायाच्या
पथावर मार्गक्रमाण केल्यास शांती स्थापित होईल असे वाटते. भारतात तर असे पुष्कळ
पंथ,संप्रदाय व गुरू आहेत. परंतु सर्वानुमते मान्य होईल अशी पद्धती,
उदारता,व्यापकता,सर्वसमावेशकता प्रत्येकात असेलच असे नाही. त्यामुळे धर्म, पंथ
प्रत्येकास आपलेसे वाटतीलच असे नाही.
विश्वातील प्रत्येक मानव कोणताही भेद भाव न करता,
एकांगी विचारधारेचे अनुकरण न करता , कोणत्याही व्यक्तीस इजा न पोहोचवता, राष्ट्राच्या
एकतेस, अखंडतेस खंडीत न करता, स्वतः बरोबरच समग्र मानवजातीचा उत्कर्ष साधून
देणाऱ्या, जीवनात समग्र सुख, शांती, आनंद प्राप्त करवून देणाऱ्या, मनुष्य ज्या पथावर निर्भयपणे अग्रेसर होऊ शकेल अशा
मार्गाचे प्रतिपादन आपल्या भारतीय प्राचीन योग परंपरेत केलेले आहे. महर्षी पतंजलि
यांनी अष्टांग योगाचा मार्ग संगीतला आहे. हा मार्ग म्हणजे कोणत्या मताचा पंथाचा
संप्रदायाचा नसून उत्तम जीवन जगण्याची, शारीरिक-मानसिक-बौद्धिक विकास व समतोल
साधण्याची ही एक कला आहे.
योग –
योगश्चित्तवृत्तिनिरोधः।
- (योगसूत्र १.२)
सर्व चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग होय. यालाच 'समाधी' म्हणतात.
संस्कृत मधील युज् धातूपासून
योग शब्द बनला आहे. युज् म्हणजे जोडणे /मिलन,संयम/नियंत्रण करणे. परम तत्वाशी मिलन
साधून देणारा, शरीर आणि मनाला संयमित करणारा या अर्थी या शब्दाचा प्रयोग केला जातो.
अलीकडच्या काळात लोकांना योग सहज सोपा वाटतो. केवळ शारीरिक कसरती करणे, शरीराला पिळवटणे,ताणणे,
श्वास प्रश्वासाचे जटिल मार्ग अवलंबणे असे मर्यादित रूप योगास प्राप्त झालेले दिसते.
ही केवळ योगाची बाह्य बाजू झाली. केवळ शरीर सुदृढ करणे हे योगाचे एकमात्र ध्येय
नसून शरीराच्या सुदृढते बरोबरच मानसिक समतोल साधणे. मानवी मनामध्ये सामावलेल्या सुप्त
शक्तीचे जागरण करवून आत्मसाक्षात्कार साधणे हे योग साधनेचे परम ध्येय आहे. अमरत्व
प्राप्त करवून देण्याची शक्ती योग साधनेत सामावलेली आहे.
अष्टांग योग मार्ग (संक्षिप्त परिचय) –
यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयः
अष्टौ-अङ्गानि ।
- (योगसूत्र २.२९)
यम,नियम,आसन,प्राणायाम,प्रत्याहार,धारणा,ध्यान,समाधि
ही योगाची आठ अंगे होत.
१.यम - अहिंसा,सत्य ,अस्तेय,ब्रह्मचर्य,अपरिग्रह हे पाच यम होत.
२.नियम - शौच,संतोष,तप,स्वाध्याय,ईश्वरप्रणिधान हे पाच नियम होत.
३.आसन - सुखात्मक व स्थिर शरीराची स्थिती म्हणजे आसन होय.
४.प्राणायाम - श्वास आणि प्रश्वास यांच्या निरोधची क्रिया
म्हणजे प्राणायाम होय.
५.प्रत्याहार - आपल्या इंद्रियांना विषयांपासून विमुख करणे
म्हणजे प्रत्याहार होय.
६.धारणा - ध्येय विषयावर मन स्थिर करणे म्हणजे धारणा होय.
७.ध्यान - धारणेद्वारे मन ज्या
विषयावर स्थिर केले त्याच विषयाचे निर्वेध चिंतन करणे म्हणजे ध्यान होय .
८.समाधि - ध्यान करतेवेळी साधकाच्य ठिकाणी असलेल्या कर्तेपणाचा अभाव दूर होऊन आत्मास्वरूपाशी एकरूप होणे यालाच समाधी
म्हणतात.
यातील यम ,नियम ,आसन ,प्राणायाम व प्रत्याहार या पाच अंगांचे अनुष्ठान चित्ताबरोबरच
अन्य साधनांद्वारेही केले जात असल्यामुळे त्याला बहिरंग योग असे म्हणतात. धारणा,
ध्यान, समाधी हे केवळ चित्ताद्वारे होत असल्यामुळे या तीन साधनांनाद्वारे होणाऱ्या
योगास अंतरंग योग म्हणतात. हा योग
मार्ग केवळ योगींसाठी नसून जीवनात सुख प्राप्त करण्याची इच्छा असलेल्या
प्रत्येकासाठी आहे.
योग आचरणाचे लाभ –
पातंजल योगसूत्र या ग्रंथात निर्दिष्ट केलेल्या या अष्टांग योग मार्गाच्या
आचरणाने मनुष्य शारीरिक,बौद्धिक,मानसिक असा सर्वतोपरी विकास साधून जीवनात परम सुखाची
अनुभूती प्राप्त करू शकतो.
१. योग मार्गाचे पालन
केल्याने मानवता,धर्म,आध्यात्म विज्ञान या प्रत्येक कसोटीवर यशस्वी होणे साध्य आहे.
२. शारीरिक , मानसिक
संघार्षांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
३. शारीरिक सामर्थ्य ,सुदृढता,उत्साह
वर्धन होते.
४. शरीराच्या बाह्य सौंदर्य वर्धनाबरोबरच
आंतरिक स्वरूपाची अनुभूती प्राप्त करणे शक्य होते.
५. जीवनाच्या सामान्य आचार
विचारांपासून ते ध्यान, समाधीसह आध्यात्मिक उच्च अवस्थांचा यात समावेश असल्याने व्यक्तीच्या
समग्र व्यक्तिमत्वाचा विकास होतो.
६. व्यक्ती स्वकल्याणाबरोबरच
समग्र मानव जातीचे कल्याण करण्यास समर्थ होते.
समग्र
जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. २१
जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा (दीर्घ) दिवस म्हणून गणला जाते आणि योगही
मनुष्यास दीर्घायुष्य प्रदान करतो.
अशा
या आजच्या आठव्या योग दिनाच्या दिवशी योगाचे आचरण करण्याचा मनी संकल्प करूया, स्वविकासाबरोबरच
समग्र मानव जातीच्या विकासात आपले योगदान देऊया. सर्वांना योग दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा !!!
कु .कश्मिरा दळी
सहाय्यक
प्राध्यापिका
क.का.सं.वि.रामटेक, रत्नागिरी उपकेंद्र
Comments
Post a Comment