राजधर्मविचार - लेखमाला - पुष्प १ले

 

राजधर्मविचार

 

- श्री. आशिष अनिल आठवले

समन्वयक, क.का.सं.वि., रत्नागिरी उपकेंद्र

8600526882

aashisha@kksu.org

 

  

    र्म या शब्दाचा ‘Religion’ इतकाच सीमित अर्थ न घेता आचरणपद्धती असा अर्थ अभ्यासक आणि जाणकार यांच्यात आता रूढ झाला आहे. या अर्थाने राजधर्म या शब्दाचा अर्थ लावायचा झाल्यास ‘राज्ञः धर्मः – राजधर्मः’ अर्थात् राजाचा धर्म म्हणजे राजधर्म असा अर्थ लावता येईल. यातील धर्म या शब्दाचा वरीलप्रमाणे अर्थ घेतल्यास राजाच्या आचरणाविषयीचा विचार हा राजधर्म या संज्ञेचा प्रतिपाद्य विषय आहे असे म्हणता येईल. श्रुतींनंतर आलेल्या विविध स्मृतीग्रंथांपासून ते कौटिलीय अर्थशास्त्रापर्यंत राजधर्माचा विचार केलेला आहे. रामायण महाभारत या विदग्ध ग्रंथांमध्येही पुष्कळ प्रसंगी राजधर्माचा विचार मांडलेला दिसतो. प्रस्तुत ‘राजधर्मविचार’ या लेखमालेत क्रमशः ‘राजधर्म’ या विषयावरील मुक्तचिंतन मांडणार आहे. भारतीय ज्ञान परंपरेत प्रसिद्ध असलेल्या ग्रंथांच्या आधारे या विषयाची मांडणी करणे योग्य ठरेल. तेव्हा भारतीय दृष्टीकोनातून आधुनिक काळातही यातील तत्त्वे देशात लागू होण्यास पात्र आहेत किंवा कसे हा प्रश्न वाचकांच्या विचारार्थ प्रस्तुत करून विषयाला आरंभ करूया.

            भारतीय राज्यव्यवस्था ही आधुनिक काळात लोकशाही पद्धतीची होईपर्यंत राजसत्ताक पद्धतीचीच होती याबाबत दुमत नाही. अशा राजसत्ताक पद्धतीत राजाचे आचरण, त्याची कर्तव्ये अर्थात् त्याचा धर्म काय होता किंवा असला पाहिजे याबाबत विचार येतो. आधुनिक काळात मनुस्मृती टीकेचे साधन बनली असली तरी कोणे एकेकाळी समाजव्यवस्था ही मनुस्मृतीनुसारच होती असे म्हणायला हरकत नाही. या मनुस्मृतीच्या आठव्या अध्यायात राजधर्माबाबत विचार केलेला दिसतो. पहिल्याच श्लोकात सांगतात –

राजधर्मान्प्रवक्ष्यामि यथावृत्तो भवेन्नृपः ।

संभवश्च यथा तस्य सिद्धिश्च परमा यथा ।। ७.१ ।।

आता राजधर्म काय असतो याचा उल्लेख करावयाचा आहे. पण येथे ही गोष्ट विचारात घ्यावी लागेल की राजधर्म म्हणजे केवळ क्षत्रियांचा धर्म नव्हे. कुल्लूकभट्टाने मनुस्मृतीवर मन्वर्थमुक्तावली नावाची जी टीका लिहिली आहे त्यात याचे स्पष्टीकरण आढळते. त्यानुसार राजधर्म हा शब्द क्षत्रियजातीवाचक नसून तो अभिषिक्त अशा जनपद अथवा नगराचे पालन करणाऱ्या पुरुषाशी निगडीत आहे. म्हणजेच केवळ क्षत्रिय राजाच नव्हे तर ज्याच्यावर त्या त्या ठिकाणच्या जनसमूहाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे अशा प्रत्येक जननायकाशी संबंधित विषय राजधर्मप्रकरणात येतो. आजच्या काळातल्या लोकशाही पद्धतीशी या संकल्पना अशाप्रकारे आधुनिक दृष्टीने पडताळून पाहिल्यास पुष्कळ ग्राह्य गोष्टी सापडतील.

केवळ क्षत्रिय नव्हे असे सांगितले असले तरी क्षत्रियाचा स्वधर्म हा राज्यपालन असल्याने क्षत्रिय हाच राज्याधिकारी आहे असे सांगतात. राजाचे वर्तन कसे असावे, राजाची उत्पत्ती आणि ज्यामुळे त्याला परलोकी उत्तम गती मिळेल असे काही नियम सांगतात. मनुस्मृतीतील राजधर्मप्रकरणापासून या विषयाला सुरुवात केली असली तरी या संबंधाने अन्य स्मृतींमध्ये मांडलेले विचार, रामायण, महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र ते अगदी काही ठिकाणी शिवरायांचे चरित्र या सर्वांचा साकल्याने अभ्यास करून सद्यस्थितीत आपल्याला विचार करणे भाग पडेल अशी लेखमाला गुंफण्याचा विचार आहे. तेव्हा या विषयाबद्दल अधिक माहिती क्रमशः पुढील लेखांत पाहूया.

Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature