राजधर्मविचार - लेखमाला - पुष्प २रे

 

राजधर्मविचार : पुष्प २रे

- श्री. आशिष अनिल आठवले

समन्वयक, क.का.सं.वि., रत्नागिरी उपकेंद्र

8600526882

aashisha@kksu.org

 


            प्रजेच्या रक्षणासाठी आणि हितासाठी परमेश्वराने इंद्र, वायू, यम, सूर्य, अग्नी, वरुण, चंद्रमा आणि कुबेर यांचे अंश घेऊन राजाची निर्मिती केली असे सांगितले आहे. म्हणूनच प्रजापालन आणि प्रजारक्षण हे राजाचे आद्य कर्तव्य बनते. आता या देवतांचे अंश घेऊन राजाची निर्मिती केली म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित झाला असता हे लक्षात घ्यावे की इंद्र हे सार्वभौमत्वाचे प्रतीक, वायू वेगाचे, यम कठोरतेचे, सूर्य प्रखरतेचे, अग्नी तेजस्वितेचे, वरुण सौहार्दाचे, चंद्रमा शांततेचे तर कुबेर हे वैभवाचे प्रतीक आहे. राजा यांनी बनलेला असतो म्हणजे या गुणांनी संपन्न असतो. कारण राजाला वेळोवेळी हे गुण उपयोगी पडत असतात. आपल्या गुणातिशयाने तो योग्य वेळी योग्य वर्तन करतो.

सोऽग्निर्भवति वायुश्च सोऽर्कः सोमः स धर्मराट् ।

स कुबेरः स वरुणः स महेन्द्रः प्रभावतः ।।

            राजाने अग्निरूप धारण करणे म्हणजे तेजस्वीपणे वर्तन करणे. सामान्य अग्नीच्या जवळ चुकून जरी कोणी गेला तरी तो अग्नी केवळ त्या एकालाच जळतो, परंतु राजाग्नी मात्र राजसत्तेला आव्हान देणाऱ्या शत्रूचा समूळ नायनाट करतो. येथे शिवरायांचे रूप आठवते. वाऱ्याच्या वेगाने शत्रूवर आक्रमण करणे, सूर्यासारखा प्रखर पराक्रम, चंद्रासारखे शीतल अंतःकरण, आणि शत्रूचा काळ बनून उभे राहणारे छत्रपती शिवाजी महाराज समर्थ म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच ‘श्रीमंतयोगी’ होते !

            राजाला प्रजेच्या रक्षणासाठी वेळोवेळी वेगवेगळी रूपे घ्यावी लागतात. असे म्हणतात की राजाच्या प्रसन्नतेत लक्ष्मी वास करते, पराक्रमात श्रीविजय तर त्याच्या क्रोधात मृत्यू वास करतो.

यस्य प्रसादे पद्मा श्रीर्विजयश्च पराक्रमे ।

मृत्युश्च वसति क्रोधे सर्वतेजोमयो हि सः ।।

            आता आधुनिक काळात हे पडताळून पाहू. आजच्या काळात प्रजेच्या रक्षणासाठी कोणाची नियुक्ती आहे असे विचारले तर लोकनेते सहजच समोर उभे राहतात. यांच्या निर्मितीचा आज आधार काय ? तर संविधान हे उत्तर मिळते. लोकनेत्याचेही आद्यकर्तव्य प्रजेचे पालन आणि रक्षण ! म्हणजे मग स्वाभाविकपणे लोकनेत्याच्या ठिकाणी सौहार्द, प्रखरता, इ. वरील गुण असायला नकोत का ? या गुणांनी आदर्श बनतो म्हणजेच हे गुण आदर्श बनण्याची अर्हता आहेत असे समजावे लागेल. म्हणजेच आज आपल्याला आपल्या लोकनेत्यांमध्ये कोणते गुण असावेत याचा आदर्शपाठ येथे नमूद आहे असा निष्कर्ष निघेल. राजाप्रमाणे लोकनेत्याला ईश्वरस्वरूप मानावे की नाही हा वादाचा मुद्दा असला तरी आजही लागू पडणाऱ्या किमान अपेक्षा स्वीकारायला हरकत नसावी. राजा आणि सार्वभौम प्रजासत्ताकातील प्रमुख नेता हा तुल्य मानला तर वरील गुणांनी त्याची पारख करायला हवी. पुढे अमात्य इत्यादी गोष्टी विचारार्थ येतील त्यावेळी याचा अधिक खुलासा करूच; परंतु तूर्त जो कोणी प्रजेचा पालनकर्ता ‘मुख्य-मंत्री’ आहे त्याने या गुणांनी युक्त असावे यात गैर काहीच नव्हे !

            राजधर्माचा विचार हा भारतातील प्रजासत्ताक राज्यव्यवस्थेच्या दृष्टीने मांडायचा म्हणजे तो साररूपाने आणि प्राप्त परिस्थितीत कसा सुसंगत ठरेल याचा विचार करून मांडावा लागतो. आज दुर्दैवाने या उत्तम नेतृत्वगुणांची कमतरता दिसून येत आहे. असे असले तरी समर्थ शिवरायांना लिहितात त्याप्रमाणे –

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।

सर्वज्ञपणें सुशील । सर्वां ठायीं ।।

            अशा एकाद्या नेत्याचा उदय असंभव नाही. असे नेतृत्व आपल्या परंपरेतील या समृद्ध विचारांनी, संस्कारांनी नक्कीच घडू शकेल यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature