राजधर्मविचार - लेखमाला - पुष्प ३रे

 राजधर्मविचार : पुष्प ३रे

- श्री. आशिष अनिल आठवले

समन्वयक, क.का.सं.वि., रत्नागिरी उपकेंद्र

8600526882

aashisha@kksu.org


राजधर्माचे यथायोग्य पालन करणाऱ्या राजाने प्रजारक्षण सुयोग्यपणे करता यावे म्हणून काही नियम घालून दिलेले असत. याबाबत एक स्पष्ट आणि मार्मिक विधान मनुस्मृतीत येते –

तस्माद्धर्मं यं इष्टेषु स व्यवस्येन्नराधिपः ।

अनिष्टं चाप्यनिष्टेषु तं धर्मं न विचालयेत् ।।

यातील दुसऱ्या ओळीत सांगतात की राजाने ज्या नियमांची व्यवस्था धर्मशास्त्रानुसार केली असेल ते नियम एखाद्यास आवडत नसले तरी त्याने त्या नियमांचे उल्लंघन करू नये. येथे दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक, राजाची स्थापना ही धर्मानुसार झाली असल्याने तो धर्मस्वरूप आहे हे मानले आहे आणि दोन, धर्मस्वरूप राजाने शास्त्रमर्यादेनुसार केलेले नियम हे अंतिम असतात. आणि म्हणूनच राजाने केलेले नियम ज्यांना अनपेक्षित आहेत त्यांनीही त्या नियमांचे उल्लंघन करू नये हा अनैसर्गिक न्याय नाही. आजही अशीच स्थिती आहे. योग्य पद्धतीने एखादा अधिनियम अथवा कायदा तयार केला असेल तर तो सर्वांना समान लागू असतो. त्याबाबत असहमती आहे म्हणून त्या कायद्याचे ज्याप्रमाणे उल्लंघन करून चालत नाही त्याप्रमाणेच राजाज्ञेचे आहे. आता राजाने असे नुसते नियम करून भागणार नाही. म्हणूनच राजाच्या कार्यसिद्धीसाठी परमेश्वराने ‘दंड’ या संकल्पनेची उत्पत्ती केली. इथून पुढे राजधर्माला पूरक अशा या दंडाचे स्वरूप आपण पाहूया.

‘दंड’ ही संकल्पना अमूर्त आहे. आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत सांगायचे झाले तर राजाने केलेले नियम अथवा एकूणच समाजात असलेले नियम (म्हणजेच धर्म) हे जर स्थितिज ऊर्जा (Static Energy) असेल तर  ‘दंड ही गतिज ऊर्जा (Kinetic Energy) आहे. म्हणूनच सांगतात –

तस्य सर्वाणि भूतानि स्थावराणि चराणि च ।

भयाद्भोगाय कल्पन्ते स्वधर्मान्न चलन्ति च ।।

            या दंडामुळेच सारे प्राणीमात्र आपले कर्म करण्यास प्रवृत्त होतात आणि धर्माचे (नियमांचे) उल्लंघन करीत नाहीत. आजच्या कायद्याच्या भाषेत यालाच “Binding force of Law” असे म्हणतात. अमुक एक गोष्ट केली पाहिजे असा नियम असेल तर ती गोष्ट न केल्यास तो गुन्हा ठरतो (Nonfeasance) आणि अमुक एक गोष्ट करू नये असा नियम असेल आणि ती गोष्ट केली तर तोही गुन्हा ठरतो (Misfeasance). म्हणजेच कायदा नुसता पुस्तकात असून उपयोग नाही तर त्याप्रमाणे जे वर्तन माणसाकडून ज्यामुळे घडते त्या अमूर्त संकल्पनेस दंड असे म्हणता येईल. राजाने याची अंमलबजावणी योग्य रीतीने करावयाची असते. म्हणून एका अर्थाने हा दंड म्हणजेच शासनकर्ता राजा आहे कारण त्याच्याकडे राज्य करण्याची शक्ती आहे आणि हा दंड म्हणजे नेता आहे –

स राजा पुरुषो दण्डः स नेता शासिता च सः ।

चतुर्णामाश्रमाणां च धर्मस्य प्रतिभूः स्मृतः ।।


तो नेता आहे म्हणजे काय याचे विश्लेषण टीकेत फार छान पद्धतीने आले आहे – ‘स एव नेता तेन कार्याणि नीयन्ते प्राप्यन्ते’ अर्थात दंडामुळे कार्ये संपन्न होतात अथवा पुढे नेली जातात म्हणून त्याला नेता असेही म्हटले आहे. येथे ‘प्रतिभूः’ या शब्दाचे आत्यंतिक महत्त्व आहे. प्रतिभू म्हणजे जामिनदार. हा दंड म्हणजे चारही आश्रमांचे जे धर्म प्राप्त करावयाचे असतात त्यांच्या प्राप्तीसाठी जामिनदार आहे. सहाजिकच चारही आश्रमाचे जे धर्म आहेत त्यांच्या पूर्ततेचा हवाला देणारा जर कोणी असेल तर तो धर्म आहे. असे म्हणण्याचे कारण जो एखाद्याचा जामिनदार असतो त्याच्यावर मोठी जबाबदारी असते. त्या त्या आश्रमात धर्माचे पालन व्हावयाचे असेल तर ते धर्माचरण करावयास प्रवृत्त करणारा एक गतिशील घटक असला पाहिजे. तो गतिशील घटक म्हणजे दंड आहे असे मन्वादि सांगतात.

Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature