सफर मंदिर संस्कृतीची भाग २ (कोळीसरे , रत्नागिरी)
सफर मंदिर संस्कृतीची (कोळीसरे , रत्नागिरी)
स्वरूप काणे
समन्वयक, (CDOE)
भारतरत्न डॉ. पां.वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र
क.का.सं.वि. रामटेक
कोकणात विविध ठिकाणी अनेक मंदिरे दृष्टीस पडतात. प्रत्येक मंदिराला एक इतिहास आहे अथवा आख्यायिका आहे. यातीलच एक मंदिर आपण आज पाहणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील श्री गणपतीपुळे या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून २१ कि. मी. अंतरावरील कोळिसरे गावात श्री देव लक्ष्मीकेशवाचे मंदिर आहे. तर या मंदिराची आख्यायिका अशी की, कोळीसरे गावाच्या जवळ वरवडे नावाचे गाव होते. या गावात काणे, विचारे, जोशी यांची घरे होती. भगवान श्री लक्ष्मीकेशवांनी सर्वांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि रंकाळा तलावातील स्वतःचे स्थान सांगितले. लागलीच सर्व मंडळी कोल्हापुरात गेली व रंकाळा तलावाजवळ शोध घेऊ लागली. अथक श्रमाने त्यांना मूर्ती मिळाली. सर्वाना अत्यानंद झाला. आता हि मूर्ती परत वरवडे गावात नेऊ आणि तिथेच मूर्तीची स्थापना करू या विचाराने सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने कोळीसरे गावात आली. थोडी विश्रांती घेऊन पुढील दिवशी वरवडे गावात जाऊ असा विचार त्यांनी केला. मात्र त्याच दिवशी रात्री देवाने पुन्हा दृष्टांत देत सांगितले की माझी या कोळीसरे गावातच स्थापना करा कारण हे स्थान मला अत्यंत रम्य वाटले आहे. दुसऱ्या दिवशी खूप दमल्याने आपल्याला थकवा येऊन भास झाला असेल असा विचार करून सर्व मंडळी पुढील प्रवासासाठी मूर्ती उचलायला गेले मात्र मूर्ती काही हलेना तेव्हा सर्वांना दृष्टांताचा प्रत्यय आला. मूर्तीची स्थापना झाल्यावर तिथे गंगा प्रकटली जी आजही खळाळून वाहत आहे.
हे मंदिर भगवान विष्णूचे असून मंदिरातील मूर्ती अखंड काळ्या पाषाणाची आहे. या मूर्तीची उंची ५ फूट ५ इंच व रुंदी २७ इंच इतकी आहे. मंदिराच्या सभोवताल श्री रत्नेश्वर आणि श्री हनुमान यांची सुंदर व रेखीव मंदिरे आहेत. मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात घनदाट हिरवीगार झाडी, उंच उंच वृक्ष आणि मंदिराच्या पायथ्याला श्री देव लक्ष्मीकेशवाच्या कृपेने अखंड वाहणारा तीर्थरूपी पाण्याचा झरा असे वातावरण मनाला स्थिरता प्रदान करते.
मंदिरात असलेल्या माहिती फलकातील माहितीनुसार या मूर्तीच्या रचनेवरून ही मूर्ती शिलाहारकालीन असावी. ही मूर्ती एका रथवाहिकेवर(पीठावर-पाटावर) उभी आहे. परंतु पायाखाली कमळाची योजना नाही. या मूर्तीच्या 1/ ३ आकारात डाव्या हाताखाली देवी लक्ष्मी तर उजव्या हाताखाली गरुड वाहन व जय- विजय आहेत. तसेच या मूर्तीच्या पेक्षा उंचीच्या चक्रपुरुष व शंखपुरुषाचे (आयुध पुरुषांची) मूर्ती कोरलेल्या आहे. मूर्ती चतुर्भुज असून उजव्या हातात पद्म (अर्ध उमललेले). उजव्या वरील हातात दंडयुक्त शंख, डाव्या वरील हातात दंडयुक्त चक्र व डाव्या खालच्या हातात षटकोनी दंड, लंबगोलाकार गदा आहे.
कानात कुंडले, डोक्यावर मुकुट, मुकुटाच्या मध्यभागी कीर्तीमुखाची रचना असून मुकुटाच्या मागे स्वतंत्र प्रभामंडळ आहे. मूर्तीच्या अंगावर टपोऱ्या मोत्यांची मण्यांची एकावली माळ असून बोटांमध्ये अंगठ्यांची देखील निमिर्ती केली आहे. पायात देखील दागिने कोरीव आहेत. मूर्तीकडे पाहताच नजर खिळून राहते. मंदिराचे बांधकाम देखील उत्कृष्ट आहे. श्री लक्ष्मीकेशवाचा वार्षिक उत्सव कार्तिक शुक्ल दशमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर भक्ती व निसर्गाची किमया यांच्या दुहेरी संगमाचे दर्शन घडवते.
Comments
Post a Comment