सफर मंदिर संस्कृतीची (श्री कऱ्हाटेश्वर ,रत्नागिरी)
स्वरूप काणे
समन्वयक, (CDOE)
भारतरत्न डॉ. पां.वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र
क.का.सं.वि. रामटेक

साधेपणा म्हटलं की आधी नजरेसमोर येतो तो कोकण प्रांत.. या भागातील माणसे जशी साधीभोळी तशीच त्यांची राहणी... याच साधेपणाने नटलेले आणि आपले महत्त्व राखून असलेल्या मंदिराबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. कऱ्हाटेश्वर मंदिर हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील जयगड मधील नांदिवडे गावात आहे. साधारण रत्नागिरी शहरापासून आरे वारे मार्गे हे मंदिर ४० ते ४५ किमी अंतरावर आहे. मंदिर कौलारू असून अगदी साधी बांधणी असलेले आहे. मंदिराच्या आतील पूर्ण भाग हा लाकडात कोरलेला आहे. मंदिर खालच्या बाजूला असून मंदिरात जाण्यासाठी १० ते १२ पायऱ्या आहे. या पायऱ्या उतरूनच मंदिरात जाता येते.
हे मंदिर कौलारू असून अगदी साधी बांधणी असलेले आहे. मंदिराच्या आतील पूर्ण भाग हा लाकडात कोरलेला आहे. हे कोरीवकाम डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. मंदिराच्या बाजूंला श्री गणरायाचे मंदिर आहे. तर मंदिरात प्रवेश केल्यावर शांततेच्या गर्तेत असणारी गाभाऱ्यातील शिवपिंडी व त्यावर नजर स्थिरावलेला पाषाण नंदी जणू भारावून व तल्लीन करणाऱ्या वातावरणाची अनुभूती देत असतो. मंदिरासमोर आखीव रेखीव अशी दीपमाळ आहे. हे मंदिर फार प्राचीन असून मंदिराच्या जीर्णोद्धार केल्याच्या नोंदी देखील आहेत.
मंदिराच्या पूर्वेला किल्ले जयगड आणि शास्त्री नदीच्या मुखाचा परिसर दिसत असतो. मंदिराचा पूर्ण परिसर वृक्ष वेलींनी वेढलेला आहे. त्या बाजूने साधारण शंभर दगडी पायऱ्या उतरून गेले की गोमुखातून निरंतर वाहणारा झरा दृष्टीस पडतो. याच गोमुखाच्या समोर फेसाळता रत्नाकर कऱ्हाटेश्वराच्या भूमीला वारंवार लाटांनी धडक देऊन एकप्रकारे कऱ्हाटेश्वराचे पादप्रक्षालन करताना दिसतो. नारायणभाऊ जोग रामदासी यांनी अगदी समर्पकपणे कऱ्हाटेश्वराचे स्थानमाहात्म्य सांगितले आहे तशा आशयाचे मंदिरात देखील फलकातून नमूद केलेले आहे.
ते असे,
एकांतस्थळी हा सुरम्य विलसे नाम कऱ्हाटेश्वर,
पायी सागर हा नित्य वसतसे गर्जोनिया गंभीर
नामाचा जयघोष भक्त करिती येउनिया सत्वर
ऐसा शंकर वंदिला निशिदिनी जोडोनी दोन्ही कर
Comments
Post a Comment