सफर मंदिर संस्कृतीची ---- भाग १ (केरळ)
सफर मंदिर संस्कृतीची (केरळ)
स्वरूप काणे
समन्वयक, (CDOE)
भारतरत्न डॉ. पां.वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र
क.का.सं.वि. रामटेक
भारतासारख्या देशात प्रत्येक राज्यात हिंदू परंपरेतील महत्त्वाचा भाग असलेली अनेक देवदेवतांची मंदिरे नजरेस पडतात. प्रत्येक मंदिराला इतिहास आहे. मंदिराच्या इतिहासावरूनच तिथल्या संस्कृतीची तोंडओळख होते. काही दिवसांपूर्वी मी माझ्या महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने केरळला गेलो होतो. तिथे आम्ही आधी कोच्चीला पोहचलो व तिथून काही मंदिरे अभ्यासपूर्ण पाहिली.
आम्ही ज्या ज्या मंदिरांमध्ये गेलो तिथे प्रचंड आध्यात्मिक, सकारात्मक व धावपळीची सवय असणाऱ्या मनाला शांतता व स्थिरता प्रदान करणारे असे वातावरण होते. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात शंकरांची व त्याच्याच जोडीने हरि रुपाची मंदिरे सापडतात. आम्ही एट्टुमन्नुर, कडुथ्थुवर्ति (थालीयल महादेव) आणि वायकोम या तीन शिव मंदिरांमध्ये गेलो होतो. तिथे अशी मान्यता आहे की ह्या तीन मंदिरांमध्ये दर्शन व पूजा केली तर त्याचा पुण्यसंचय वाढीस लागतो. या तिन्ही मंदिरांच्या बाबतीत अशी एक मान्यता आहे की राक्षस खर याने एकदा भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या कठोर तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले व त्याला शंकरांकडून ३ शिवलिंगे मिळाली. राक्षस खराने तीन शिवलिंगे, प्रत्येकी हातात एक आणि तोंडात एक लिंग घेऊन प्रवास सुरू केला. काही वेळाने तो थकला तसेच लिंगे जड असल्याने त्याने उजव्या हाताचे लिंग वायकोममध्ये (वैकोम), डाव्या हाताचे लिंग एट्टमनूरमध्ये ठेवले आणि तोंडातून कडुथ्थुवर्ती येथे (मल्याळममध्ये याला काडीचिरुथी म्हणतात) ठेवले.
तसेच कडुथ्थुवर्ती या मंदिराबाबत अशी एक कथा प्रचलित आहे की एकदा या मंदिराला आग लागते तेव्हा त्या मंदिराचा पुजारी लिंगाला आलिंगन देऊन स्वतःच्या प्राणांची आहुती देतो व ते लिंग वाचवतो. यामुळे पुन्हा ते मंदिर उभे राहते. त्यामुळे त्या पुजाऱ्याचे स्मारक आजही त्या मंदिरात आहे. तत्कालीन राजाला वृध्दपणी या तिन्ही मंदिरात जायला शक्य नव्हते कारण ही मंदिरे वेगवेगळ्या दिशेला आहेत म्हणून राजाला या तिन्ही मंदिरातील देवतेचे दर्शन घेता यावे यासाठी कडुथ्थुवर्ती मंदिरात वायकोम व एट्टुमन्नुर या मंदिरातील देवतेच्या प्रतिमा स्थापन केल्या गेल्या. तसेच कडुथ्थुवर्ती इथे साडेतीन वर्षांनी उत्सव असतो. कोरोनामुळे तो झाला नाही मात्र यंदा तो होणार आहे. या उत्सवात महा रुद्र, हवन, कलशपूजनाद्वारे देवतेचे आवाहन केले जाते. आपल्याकडे जसे होळीचे लाकूड शोधले जाते त्याप्रमाणे टिकाच्या झाडाचे लाकूड आणले जाते व त्याला तेलाचे लेपन केले जाते. मंदिरासमोर ते लाकूड उभारून त्यावर क्रमशः ७५ भागांचा स्तंभ त्यादिवशी विधिवत पूजा करून उभारला जातो व त्याच्या अगदी वर छोटा नंदी ठेवला जातो. यावेळी देखील अनेक स्थानिक भक्तगण उपस्थित असतात. मंदिरात दर्शन घेताना उजवी डावी अशा दोन्ही बाजूला रांग असते मुख्य देवतेच्या समोर सरळ जागा रिकामी ठेवली जाते जेणेकरून प्रत्येकाला दर्शन घेता येईल.
त्याचप्रमाणे तेथील मंदिरात तुला करण्याची प्रथा अजून रूढ आहे. मंदिरात आबालवृध्दापासून अख्खे कुटुंब तुला करते. ज्यात अन्नधान्याचा समावेश असतो. त्याचप्रमाणे तेलदान आणि अन्नदानाला तिथे विशेष महत्त्व आहे. तेथील प्रसादात देखील विविधता आढळून आली. तिथे प्रसादात चुरमुरे, सुके पोहे, गुळ, ओल्या खोबऱ्याच्या काचऱ्या यांचा एकत्रित समावेश होता. याशिवाय वायकोम मंदिरात आम्ही पायस म्हणजे खिरीचा देखील प्रसादरुपात आस्वाद घेतला. महाराष्ट्रात क्वचित ठिकाणी केली जाणारी भाताची खीर ही तिथे प्रसाद म्हणून दिली जाते. मंदिरात आपल्यासारखी उच्चस्वरात आरती होत नाही तर तेथील पुजारी पारंपरिक वाद्य चेंडा वाजवतात त्याच्या जोडीला मंत्रघोष असतो व शंखनाद व घंटेचा निनाद देखील असतो. मला तेथील मंदिरात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठून पारंपरिक वेषात अनेक स्थानिक लोक स्वतःच्या मुलांसोबत देवाच्या दर्शनाला येतात व नंतर दैनंदिन कामे करतात तसेच रांगेत दर्शनासाठी उभे असताना कुठेच कोलाहल गोंधळ नसतो. पुरुषांना मंदिरात प्रवेश करताना शर्ट काढून अंगावर उपरण्यासारखा घ्यावा लागतो. पर्यटक म्हणून आलेल्याने तसं केल नसेल तर तेथील लोक तसे सांगतात यावरून त्यांचा संस्कृतीभिमान दिसून येतो.


Comments
Post a Comment