कर्म
कर्म
प्रा. कश्मिरा दळी
सहाय्यक प्राध्यापिका, भारतरत्न डॉ. पां.वा. काणे
संस्कृत अध्ययन केंद्र,
रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक
कर्म हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ
क्रिया असा होतो, परंतु सर्वसाधारणपणे कर्म या शब्दाचा उपयोग जे आज केले गेले आहे त्यासंबधाने
पुढे जे केले जाईल ते दाखवण्यासाठीसुद्धा करतात. कुठलीही गोष्ट केवळ अपघाताने,
योगायोगाने, किंवा विकाराने घडत नाही, तर ती एका साखळीत (क्रमाने) घडते; एका नंतर दुसरी
अशा क्रमाने अनुसर णकरत असते.
जेव्हा बीज जमिनीत पेरले जाते तेव्हा
ते अंकुरित होऊन वर येते, आणि त्याला पाने फुटतात, फुले येतात, आणि मग फळेसुद्धा येतात
आणि फळांमध्ये पुन्हा बीजे असतात, पुन्हा त्यांच्यातील
एक बीज पेरले असता त्यातून पुन्हा अंकुर, पाने, फुले, फळे आणि पुन्हा बीजे तयार होतात.
जसे बीज असते अगदी त्याच प्रकारचे बियाणे तयार होते, तांदुळापासून तांदुळच तयार होतात;
गव्हापासून गहूच तयार होतो; काटेरी वनस्पतीपासून काटेरी वनस्पतीच; निवडुंगापासून निवडुंगच
तयार होतो. मनुष्याने काटेरी वनस्पती लावून, त्यापासून गोड फळांची अपेक्षा करू नये.
हे कर्माचे तात्पर्य आहे, आणि माणसाला हे माहीत असते, म्हणून तो त्याच गोष्टीचे बीज
पेरतो, जे फल स्वरुपात प्राप्त करण्याची त्याला इच्छा आहे. या सर्व गोष्ट सर्व प्रथम
लक्षात ठेवल्या पाहिजेत.
कर्म हे जितकं सोपं वाटत तितकं सोप नाही.
जर एखाद्या व्यक्तीला विचारले, “तू गावामध्ये का जातोस? तर तो म्हणेल - “मला एक चपलांचा
जोड खरेदी करायचा आहे, आणि मला वाटले की तो मला इथे मिळू शकेल; किंवा मित्राला भेटायचे
होते आणि मला वाटले की तो गावात असेल; असेच, अनेक मार्गांनी (तो उत्तरे देईल): परंतु
‘मला अमुक-अमुक पाहिजे होते, किंवा मला वाटले, म्हणून मी असे केले’ या तीन अवस्था
आपल्याला नेहमी एकत्र पाहायला मिळतात.
आता ‘मला पाहिजे आहे’ म्हणजे मला काहीतरी
मिळवण्यासाठी इच्छा आहे, ही पहिली अवस्था आहे, याला इच्छा म्हणतात. नंतर आम्ही ते कसे
मिळवू शकतो याचा विचार करणे – ही दुसरी अवस्था आहे; नंतर ते मिळवण्यासाठी आपण कशी कृती
करतो – ही तिसरी अवस्था आहे.
साधारपणे हा नियमित क्रम आहे; प्रत्येक
क्रियेमागे विचार असतो आणि प्रत्येक विचारामागे इच्छा असते. ‘कृती, विचार आणि इच्छा’-
हे तीन धागे आहेत जे कर्माच्या दोरखंडात गुंफलेले आहेत. आपली कृती आपल्या आजूबाजूच्या
लोकांना आनंदी किंवा दुःखी करत असते जर आपण त्यांना आनंदी करत असू तर आपण बियाण्याप्रमाणे
आनंद पेरला आहे, आणि पुढे तेच आपल्यासाठी आनंदरूपाने पीक म्हणून येईल; जर आपण त्यांना दुःखी केले तर
आपण दु:ख बियाण्यासारखे पेरले आहे, आणि तेच आपल्यासाठी दुःखरूपी फळ बनेल. जर आपण क्रूर
गोष्टी केल्या, तर आपण बीजरूपात क्रूरतेलाच पेरले तर त्यामुळे फलस्वरूप क्रूरताच आपल्या
वाट्याला येते. जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर ते चांगुलपणाचे बीज आहे म्हणुन फळस्वरूपात
आपल्याला चांगुलपणाच अनुभवास येईल, अभिप्राय असा आहे की जसे आपण पेरतो तसेच फळ आपल्याला
परत मिळते, यालाच कर्म म्हणतात.
प्रत्येक कृतीमागे विचार असतो आणि हे
विचारच व्यक्तिचे चारित्र्य, स्वभाव आणि मन तयार करत असतात. तेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा
जसा विचार करतो तसे आपले मन त्या गोष्टीसारखे बनते. जर आपण दयेचा विचार केला तर आपण
दयाळू बनू; जर आपण क्रूरतेचा विचार केला तर आपण क्रूर बनू; जर आपण कपटाने विचार केला
तर आपण कपटी बनू. जर आपण प्रामाणिक विचार केला तर आपण प्रामाणिक होतो. अशाप्रकारे आपले
चारित्र्य हे आपल्या विचारांनी घडवले जाते आणि जेव्हा आपण पुन्हा जन्म घेतो तेव्हा
आपल्या विचारांनी निर्माण केलेले चारित्र्य घेऊन आपण जन्माला येत असतो. आपण आपल्या
स्वभावानुसार किंवा चारित्र्यानुसार वागतो. जशी एक दयाळू व्यक्ती दयाळूपणे वागते, किंवा
क्रूर व्यक्ती क्रूरपणे वागते; तशी आपल्या पुढील जीवनातील कृती आपल्या वर्तमान जीवनातील
विचारांवर अवलंबून असते हे सहज लक्षात येते. हेच ‘कर्म’ आहे.
पण विचारामागे इच्छा असते. आता इच्छा
आपल्या इच्छेप्रमाणे वस्तू घेऊन येते. चुंबक जसे लोखंडाला आकर्षित करते, तशीच इच्छा
वस्तूंना आकर्षित करते. जर आपल्याला पैशाची इच्छा असेल तर आपल्याला दुसऱ्या जन्मात
श्रीमंत होण्याची संधी मिळेल. जर आपल्याला शिकण्याची इच्छा असेल तर आपल्याला दुसऱ्या
जन्मात शिकण्याची संधी मिळेल. जर आपल्याला प्रेमाची इच्छा असेल तर आपल्याला प्रेम प्राप्त
करण्याची संधी मिळेल. जर आपल्याला सत्ता हवी असेल तर आपल्याला शक्तिशाली बनण्याची संधी
मिळेल. हेच ‘कर्म’ आहे.
जोपर्यंत माणसाला ते पूर्णपणे समजत नाही
तोपर्यंत त्याने याचा पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे. जेव्हा त्याला हे समजते तेव्हाच
तो कर्माच्या अधिक कठीण समस्यांकडे जाऊ शकतो. तसे कर्माचे सार एका वाक्यात सांगता येते
– 'पेरावे तसे उगवते'.
पण यावर कोणी जिज्ञासू विचारू शकतो की
- “जर आताची माझी कृती
माझ्या भूतकाळातील विचारांचे फळ असेल आणि
माझे भूतकाळातील विचार माझ्या भूतकाळातील इच्छांचे परिणाम असतील, तर
मी असहाय्यपणे बांधील नाही का?
मला वाटेल तसे मी वागले पाहिजे. माझ्या इच्छेप्रमाणे मी विचार केला
पाहिजे.” ते खरे आहे, परंतु केवळ एका
मर्यादेपर्यंतच; जसजसे आपण नवीन अनुभव घेतो तसतसे आपण सतत बदलत जातो, आणि अशाप्रकारे
जीव अधिक ज्ञान प्राप्त करतो, आणि त्याच्या मदतीने त्याच्या इच्छा बदलतात. अन्य शब्दात
सांगायचे तर, भूतकाळात आपण एका विशिष्ट प्रकारे इच्छा, विचार आणि कृती केली असताना,
इच्छा, किंवा विचार करण्याची शक्यता देखील त्या भूतकाळात अस्तित्वात आहे; आणि भूतकाळात
आपण प्रत्यक्षात केल्याप्रमाणे वागण्याचे वाईट परिणाम लक्षात येताच, नवीन अनुभवांद्वारे,
ही शक्यता, केव्हाही वास्तविकतेत बदलली जाऊ शकते.
समजा एखाद्या माणसाला असे आढळून आले की,
तो क्रूरपणे वागला आहे; त्याला कळते की त्याची क्रूरकर्मे त्याच्या भूतकाळातील क्रूर विचारांमुळे झाली होती
आणि ते क्रूर विचार एखादी वस्तू मिळविण्याच्या इच्छेतून वाढले होते जी केवळ क्रूरतेने
मिळवता येते. तो पाहतो की त्याच्या क्रूर कृतींमुळे लोक दुःखी होतात, ते लोक त्याचा
द्वेष करतात आणि त्याला घाबरतात आणि अशाप्रकारे त्याला एकाकी आणि दुःखी बनवतात, तो
या सर्व गोष्टींवर विचार करतो आणि तो स्वतःला बदलण्याचा संकल्प करतो, परंतु त्याच्या
भूतकाळातील विचार आणि इच्छांच्या दबावाचा प्रतिकार करणे खूप कठीण वाटते. तेव्हा तो
संकटाच्या मुळाशी जातो, ज्या गोष्टी त्याला क्रूरतेशिवाय मिळू शकत नाही, आणि तो जीव
स्वतःला म्हणतो - "मी स्वतः गोष्टींची इच्छा करणार नाही. जेव्हा जेव्हा मी त्यांची
इच्छा करू लागतो तेव्हा मला लक्षात येते की इच्छाच दुःख उत्पन्न करते." तेव्हा
इच्छेवर नियंत्रण ठेवण्याऐवजी तो इच्छांच्या परीक्षणाचा विचार सुरु करतो. मग इच्छा
जणु त्याला पळवून नेणारे घोडे असून त्या व्यक्तिला पळवून नेण्याऐवजी, तो हळूहळू विचारांना
लगाम म्हणून वापरून आपल्या इच्छांवर अंकुश ठेवतो. अशाप्रकारे तो त्या इच्छांना केवळ
त्या वस्तूंच्या मागे धावू देईल ज्या त्याला प्राप्त झाल्यावर आनंद देतात.
अनुभवहीन जीव त्यांच्या वासनांच्या मागे
धावतात आणि त्यामुळे स्वतःवर खूप दुःख ओढवून घेतात; याविरुद्ध अनुभवाने अनुभवी जीव
आपल्या पूर्वीच्या इच्छांमुळे प्राप्त झालेल्या दुःखांना किंवा बऱ्यावाईट परिणामांचे
स्मरण आठवून इच्छांना आपल्या अधीन करतात, आणि त्या संबंधिचे कर्म पुन्हा करत नाहीत.
तेव्हा, माणसाने असे कर्म करावे ज्यामुळे इतरांना आणि स्वतःला सुद्धा
आनंद मिळेल, म्हणून माणसाने आपल्या इच्छांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याने निरीक्षण
करून आणि अभ्यास करून शोधले पाहिजे की 'कोणत्या वस्तू दीर्घकाळात आनंद देतात आणि कोणत्या
दुःख देतात, हे सगळे समजून घेऊन प्रत्येकाने सर्व शक्तीने फक्त त्या गोष्टींची इच्छा
केली पाहिजे, त्यासठी प्रयत्न केले पाहिजेत ज्याचा परिणाम आनंद असेल.
जन्म-मृत्यूच्या बंधनातून सुटण्यासाठी
कोणत्याही विशेष जीवनपद्धतीची आवश्यकता नाही, भगवान श्रीकृष्ण म्हणतात - “जो सर्वभूतांमध्ये
विद्यमान असणाऱ्या माझी एकात्मतेने पूजा करतो, तो योगी माझ्यामध्येच राहतो” मग त्याची
जीवनपद्धती काहीही असो.
क्षत्रिय राजा जनक आणि वैश्य व्यापारी
तुलाधर या दोघांना जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ति मिळवण्याकरिता वनात जाऊन तपश्चर्या
नाही करावी लागली, परन्तु सांसारिक गोष्टींच्या इच्छेच्या अभावानेच त्यांना मुक्ति
मळाली.
जनक हा विदेह देशातील मिथिलेचा राजा होता
आणि मनाची शांती प्राप्त झाल्यावर त्याने हे गीत गायले: “माझी संपत्ती अमर्याद आहे,
आणि तरीही माझी संपूर्ण मिथिला आगीत दग्ध झाली असता देखील माझे काही जळत नाही” आणि
म्हणून त्याने मांडव्याला सांगितले की, माणसाने गोळा केलेली जी काही संपत्ती असते ती
केवळ त्रासाचेच कारण असते आणि इथे किंवा स्वर्गात उपभोगलेले जे सुख आहे, ते सर्व
इच्छांच्या समाप्ती नंतर सत्स्वरूप परमानंदाचा सोळावा भाग सुद्धा नाही.
जशी गायीची शिंगे गाईबरोबर वाढतात, तशीच
संपत्तीची लालसाही वाढते. संपत्तीचा वापर चांगल्यासाठीच केला पाहिजे. इच्छा ही दु:खांची
जननी आहे. ज्ञानी सर्व प्राणिमात्रांकडे आत्मभावाने पाहत असल्यामुळे तो सर्व चिंतांपासून
मुक्त राहतो.* राजा जनकाने याज्ञवल्क्य ऋषींच्या उपदेशाने मुक्ती प्राप्त केली, आणि
“जे अत्यंत पवित्र आहे, अमर आहे, जे सर्व दुःखातीत आहे,” अशा ब्रह्माशी एकरूप झाला.
आणि अशाप्रकारे शिकून ते पुढे चालुन स्वतः मोक्ष मार्ग प्रदर्शक झाले आणि म्हणूनच स्वतः
वेदव्यासांनी आपला मुलगा शुक याला मुक्तीचा धर्म शिकण्यासाठी त्यांच्याकडे पाठवले.
महान तपश्चर्या केल्यानंतर जाजली अभिमान
युक्त झाले आणि एकदा त्यांच्या मनात विचार आला की - "या विस्तीर्ण समुद्रात आणि
विस्तीर्ण पृथ्वीवर माझ्यासारखा कोण आहे?" त्याचवेळीएक आकाशवाणी झाली; "असे
शब्द बोलू नकोस, खरेदी-विक्रीत व्यस्त असलेल्या तुलाधारानेही असे बोलू नये, आणि तू
तर त्याच्या बरोबरीला देखील नाहीस." मग जाजलीला फारच आश्चर्य वाटले की, कसा एक
वाणी माझ्यासारख्या केवल ब्राह्मणापेक्षाच नव्हे तर तपस्वी ब्राह्मणापेक्षा मोठा असू
शकतो आणि तेच कोडे सोडविण्याकरिता तो तुलाधाराच्या शोधाकरिता निघाला. चालत चालत तो
वारणसीला येऊन पोहोचला,
आणि तिथे एक साधारण दुकानदार, ज्याच्याकडे
खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांना सर्व प्रकारचा माल विकणारा तुलाधर त्याला सापडला.
तेव्हा तुलाधराने समोर आलेल्या ब्राह्मणाला उभे राहून योग्य ते अभिवादन केला. तेव्हा
न राहवून जाजलीने त्याला अभिमानाने स्वतःच्या महान तपश्चर्येची कथा सांगितली आणि मनात
उद्भवलेल्या अहंकाराविषयी सुद्धा त्याने बोलून दाखवले. तेव्हा अतिशय नम्रपणे तुलाधार
त्याला म्हणाला - ‘हे ब्राह्मणा! “रागाने, तू माझ्याकडे आला आहेस, तरिसुद्धा मी तुमची
कोणती सेवा करू?” या तुलाधाराने दाखवलेल्या नम्रतेस पाहून जाजलीला फारच आश्चर्य वाटले
आणि त्याने उत्सुकतेने स्पष्टीकरण विचारले, तेव्हा तुलाधराने सर्वांना ज्ञात असलेल्या
परंतु जाणूनही फारच तुरळक लोकांकडून पालन केल्या जाणाऱ्या प्राचीन नैतिकतेबद्दल जाजलीला
सांगितले. मनुष्याने एक आदर्श जीवन जगावे ज्याने कोणाचेही नुकसान होणार नाही, किंवा
जेव्हा हानी पूर्णपणे टाळता येत नसेल तेव्हा किमान ती कमीत कमी प्रमाणात कशी होईल याचा
प्रयत्न करावा. जो स्वतः कोणाकडूनही कर्ज मागत नाही किंवा भांडण करत नाही; ज्याने राग
आणि द्वेष जिंकलेले आहेत. जो कोणाचीही स्तुती किंवा निंदा न करता सर्वांकडे समत्वाने
पाहतो. जेव्हा माणूस निर्भय असतो आणि त्याला कोणाचेही भय नसते, जेव्हा त्याला आवडते
किंवा नापसंत नसते, जेव्हा तो कोणावरही अन्याय करत नाही तेव्हा तो परब्रह्मापर्यंत
पोहोचतो. क्रूरतेने प्राण्यांना आणि माणसांना होणाऱ्या आघातांपासून म्हणजेच स्वतःला
हिंसेपासून परावृत्त करणे हे एक त्यागाचे स्वरूप आहे आणि मनाने कोणाच्याही शारीरिक
किंवा मानसिक हिंसेच्या भावनेपासून दूर राहणेच खऱ्या तीर्थयात्रेचे स्वरूप आहे आणि
अशा अहिंसेने मुक्ती कशी मिळवता येते, असे अतिशय सुंदर प्रकारे तुलाधाराने जाजलीला
स्पष्ट केले.
****
(संदर्भ: १९१६ साली Central Hindu College
Banaras येथून प्रकाशित झालेल्या SANATAN DHARMA AN ELEMENTARY TEXTBOOK - OF
HINDU RELIGION AND ETHICS या मूळ इंग्रजी पुस्तकातील अनुवाद क्रमशः...)

Comments
Post a Comment