यज्ञ
यज्ञ
प्रा. कश्मिरा दळी
सहाय्यक प्राध्यापिका, भारतरत्न डॉ. पां.वा. काणे
संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक
भारतामध्ये "यज्ञ"
ही संकल्पना सुपरिचीत आहे, परंतु सर्व
यज्ञांमधील निहित सिद्धान्त समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून
हे समजेल की, प्रत्येकाने इतरांच्या कल्याणासाठी स्वतः बलिदान
केले पाहिजे आणि इतर गोष्टींचे सर्व बलिदान हे माणसाला सरते शेवटी स्वतःचे बलिदान
कसे द्यावे हे शिकवण्यासाठी आहे.
सर्व प्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की, हे संपूर्ण विश्व एका यज्ञाचे स्वरूप आहे. ईश्वर जो वस्तुतः
व्यापक आहे तोसुद्धा हे विश्व प्रकट व्हावे या हेतुने स्वतःला मर्यादित करतो.
श्रुती आणि स्मृती सुद्धा हेच सत्य (हाच
सिद्धांत) घोषित करतात. जसे की
ऋग्वेदातील पुरुष सूक्तात किंवा श्रीकृष्णाने स्वतः उल्लेख केला आहे की संपूर्ण
जगतामध्ये प्राण्यांचा आविर्भाव हा यज्ञाचा एक परिणाम आहे. आध्यात्मिकदृष्ट्या
तत्वामध्ये विलीन होण्यास मृत्यु म्हटले जाते; त्याचप्रमाणे
ईश्वराने स्वत:चा त्याग केला, जेणेकरुन
त्याचे अंश वेगवेगळ्या जीवांच्या रूपात जन्माला येऊन स्वतःला अनंत शक्तींमध्ये
विकसित करू शकतील. हा प्राथमिक यज्ञ आहे आणि त्यावर शास्त्र
आधारित आहेत. इतरांच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणे
ही संकल्पना आपल्याला यज्ञाचा खरा अर्थ सांगते.
यज्ञांचे हे नियम वस्तुतः सर्व मानवजीवनाचे नियम आहेत, याच्या आधारे सगळ्या प्राणीमात्रांना यामध्ये समाविष्ट होता येते. पूर्वी उत्तरोत्तर वृद्धीसाठी बलपूर्वक प्राण दिले जात असत. त्यांच्या
अनिच्छेने म्हणजे त्यांच्या स्वतःच्या इच्छेच्याविरुद्ध किंवा अगदी याबाबतच्या
ज्ञानाशिवाय ही हे केले जात असे. त्यांचे रूप त्यांच्यापासून हिंसकपणे काढून नव्या
रुपात संरचित केले जाते. जे त्यांच्या पहिल्या रूपापेक्षा थोडे अधिक विकसित असते.
अशाप्रकारे जीव एका स्तरापासून पुढच्या स्तरापर्यंत विकासाकडे वाटचाल करते.
जसे खनिज साम्राज्यापासून वनस्पतींच्या जीवनाचा विकास खनिजांच्या
परिवर्तनाने झाला. नंतर वनस्पतींच्या जीवनाचा विकास पशुंच्या
जीवनासाठी झाला. त्यानंतर पशु जगतातील शरीरांचा नाश करून
त्यांना पुढे मानवी जगात प्रवेश करण्या योग्य बनवण्यात आले. अन्य मानवी शरीरांसाठी
मनावी शरीरांना युद्ध, नरभक्षण इत्यादीमध्ये नष्ट करून उच्च
श्रेणीच्या मनुष्यकोटीत जाण्यायोग्य करण्यात येते.
या सगळ्यांमध्ये शारीरस्थ चैतन्याच्या संमती शिवाय
इतरांच्या कल्याणासाठी आपल्या शरीराचा त्याग केला जातो. अनेक युगांनंतर शारीरस्थ
जीव या विश्वव्यापी प्रकृतिच्या नियमांना जाणतो तेव्हा सभोवतालच्या लोकांच्या
कल्याणासाठी जाणीवपूर्वक स्वतःच्या उपाधींचा त्याग करण्यास सुरुवात करतो. याला ‘आत्मत्याग किंवा आत्मसमर्पण’ म्हणतात. आणि हेच जीवाचे आत्मसमर्पण परमात्म्याशी एकत्व दर्शविणारे आहे. जीव
ईश्वराचे स्वरुप असल्याचे हे प्रमाण आहे.
आत्मत्यागाची अद्भुत कथा महाभारतात सांगितली आहे. एकदा देवांचा राजा इंद्राने एका अनुचित कर्माने महान तपस्वी ऋषींना
असंतुष्ट केले, त्यांच्या क्रोधापासून वृत्र नावाच्या
असुराचा जन्म झाला. त्या असुराच्या त्रासाने इंद्र खूप
त्रस्त झाला होता. वृत्राने दैत्यांचे नेतृत्व करून, इंद्र आणि त्याच्या सैन्याचा युद्धात पराभव केला, त्याला
त्याच्या राजधानी अमरावती पासून दूर करून त्याचे सार्वभौमत्व हिरावून घेतले.
सगळे देव त्यांच्या राजासोबत वनवासात भटकायला लागले आणि त्यांची
राजधानी परत मिळवण्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केले, परंतु
त्यांचा पुन्हा पुन्हा पराभव झाला. शेवटी त्यांना कळले की
ऋषींचा धार्मिक क्रोध दुसऱ्या ऋषींच्या स्वेच्छेने केलेल्या त्याग व दये शिवाय
शांत होऊ शकत नाही; त्या वृत्राचा वध एका पवित्र ऋषींनी
स्वतःच्या दिलेल्या अस्थींनी निर्माण केलेल्या वज्रा शिवाय इतर कोणत्याही
शस्त्राने होऊ शकत नाही. म्हणून इंद्रादी इंद्रादि देव मोठ्या
आतुरतेने ऋषींकडे गेले आणि त्यांना त्यांची दुःखद व्यथा सांगितली. ते ऐकून अतिशय दयाळु असलेले दधिची ऋषी त्यांना म्हणाले - “तुम्हाला हवा तसा उपयोग करण्यासाठी मी माझे शरीर तुम्हाला स्वेच्छेने देतो.” परंतु जेव्हा शिल्पकार
विश्वकर्मा यांनी त्यांच्या पवित्र आणि तपाने तेजस्वी अशा देहावर कठोर हात
ठेवण्यास संकोच केला तेव्हा तपस्वी दधिची हसले आणि म्हणाले – "हे शरीर मीठाने झाकून टाका; येथे
गायींचा कळप आणा; त्या मीठ आणि मांस
एकत्र चाटतील; आणि फक्त तुम्हांला हवी असलेली हाडे घ्या, जेणेकरून या शरीरातील काहीही अंश वाया जाणार नाही." आणि सांगितल्याप्रमाणे सगळे झाले आणि अशा
अद्भुत आत्मत्याग रूप बलिदानाने
वृत्रासुराचा नाश संभव झाला.
मनुष्य किंवा जीवाला अशाप्रकारे शिकवण देऊन ऋषिलोक
आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी
प्रोत्साहित करतात. ज्याचे फळ त्यांना ताबडतोब मिळत नाही पण परिणामस्वरूप कितीतरी
पट अधिकरूपाने ते परत मिळते. ते दाखवून देतात की, जेव्हा माणूस इतरांसाठी काहितरी देतो तेव्हा त्याचे प्रति फळ भविष्यात
वृद्धिंगत होऊन त्याला परत मिळते. एखादी व्यक्ती वर्तमानात
काही गोष्टींचा त्याग करून त्या वस्तूंच्या आनंदापासून स्वतःला वंचित ठेवते तेव्हा
त्याला त्या सर्व वस्तूंपेक्षा ही अधिक आनंददायी वस्तू स्वर्गात प्राप्त होतात.
अशाप्रकारे त्याग करण्याची प्रथा रूढ झाली आणि मनुष्याने भविष्यातील उत्तम
प्रतिफळाच्या आशेने, इतरांच्या सेवेसाठी स्वतःच्या
मालमत्तेचा व स्वतः बलिदान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या सेवेच्या आनंदात
प्रतिफळ शोधण्याची शिकवण देण्यात आली.
या यज्ञांमध्ये आणखी एक धडा शिकवला गेला तो म्हणजे
माणसाचा सभोवतालच्या सर्व प्राण्यांशी असलेला घनिष्ठ संबंध; त्यांच्या व्यतिरिक्त माणसाचे अलिप्त असे जीवन नाही, सर्वांचे जीवन परस्परावलंबी आहे आणि हे परस्परावलंबित्व ओळखूनच सर्व
कायमचे समृद्ध होऊ शकतात. ऋषींनी माणसाला दररोज देवांसाठी,
ऋषींसाठी, पितरांसाठी, मनुष्यांसाठी
आणि प्राण्यांसाठी बलिदान करायला शिकवले आणि त्याला दाखवले की या सर्वांनी आपले
जीवन समृद्ध करण्यासाठी बलिदान केले आहे. त्यामुळे आपल्यावर यांचे ऋण आहे आणि ते
पंचमहायज्ञांच्याद्वारे ते ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे, जे
दररोज पंचमहायज्ञ करत आपण आपले ऋण फेडले पाहिजे. मनुष्य जसा
इतरांवर अवलंबून जगतो, त्याचप्रमाणे त्याने, इतरांसाठी प्रामाणिकपणाने जगले पाहिजे. त्याग ही अशी
एक गोष्ट आहे जी प्रत्येकाने केली पाहिजे.
जीवाला जेव्हा आपल्या अस्तित्वामागे आपल्या
आईवडिलांच्या आणि ईश्वराच्या अनुकंपेचा बोध होतो तेव्हा तो त्याला त्याग किंवा
दुसऱ्यासाठी जगण्यात आनंद मिळवतो, आणि आपल्यामध्ये असलेल्या एका दिव्य
शक्तीचा तो अनुभव घेतो. तेव्हा दुसऱ्यांकडून कमीत कमी
घेण्याची आणि दुसऱ्यांना अधिकाधिक देण्याची कृती करतो व अशाप्रकारे जणु काय तो
सगळ्या प्राणिमात्रांचा मित्र बनतो. त्याला समजायला लागते की
संवेदनशील प्राण्यांची शिकार करणे, माणसाने भोजन किंवा आनंद
प्राप्तीसाठी केली जाणारी प्राण्यांची हत्या इत्यादि मनुष्याची उत्क्रांतीच्या
टप्यावर आवश्यक क्षमता आणि शक्तींच्या विकासासठी हे कुठेतरी आवश्यक होते, परंतु पुरुषांनी हळूहळू यातून विकसित व्हायला हवे. दुर्बलांना
बळी पाडण्याऐवजी नम्रता, सहानुभूती आणि प्रेमळपणाची क्षमता
जोपासत तरुणांनी दुर्बलांना मदत करायला हवी.
जेंव्हा मनुष्य आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या
व्यक्तींबरोबर एकात्मतेचा अनुभव करतो तेव्हा त्याला आपल्याहून मोठ्या
व्यक्तींपासून आणि विश्वाच्या पालनकर्त्या ईश्वरापासून आपण भिन्न नसल्याची जाणीव
होऊ लागते. हळूहळू त्याला हे जाणवते की, जसे ईश्वर
सर्वांसाठी आणि सर्वांमध्ये वास करतो, तसे आपले खरे कार्य
इतरांसाठी जगणे आहे. मनुष्याचा खरा आनंद एक ईश्वराचे
साधन बनण्यात आहे. तेव्हा ईश्वरासाठी केले गेलेले प्रत्येक कार्य हे यज्ञ बनते आणि
असा यज्ञ त्याला बंधनात टाकत नाही तर यज्ञ हा त्यागाचा आणि मोक्षाचा नियम बनतो.
(संदर्भ: १९१६ साली Central Hindu College Banaras येथून
प्रकाशित झालेल्या SANATAN DHARMA AN ELEMENTARY TEXTBOOK - OF HINDU
RELIGION AND ETHICS या मूळ इंग्रजी पुस्तकातील अनुवाद
क्रमशः...)
Comments
Post a Comment